गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

‘गळेपडू’ विश्वासघाताचा सज्जड पुरावा

Shortly before he sent the messages he also posed for a series of pictures with strangers carrying a placard that read: 'I am Muslim, I am labelled a terrorist, I trust you, do you trust me enough for a hug?'

हल्ली एक गोष्ट माझ्यासाठी खुप सोपी झाली आहे. रोज ब्लॉग लिहीताना मला फ़ारसे कष्ट पडत नाहीत. मला सर्वच बातम्या शोधत बसाव्या लागत नाहीत. सातत्याने माझे ब्लॉग लेख वाचणारा वाचक बराच जागरुक झाला आहे आणि तोच मला अनेक विषय पुरवित असतो. विषय चांगल्या सुटसुटीत भाषेत मांडण्यापुरती मला मेहनत करावी लागते. महेश पाटिल हा असाच एक फ़ेसबुक मित्र आहे. त्याने मला उद्देशून एक पोस्ट बुधवारी टाकली. त्याला माझ्या एका जुन्या लेखाचा संदर्भ होता. पॅरीसच्या घातपाती बॉम्बस्फ़ोटानंतर तिथे जमलेल्या गर्दीत एक मुस्लिम तोंडावर आवरण घेऊन उभा राहिला होता. ‘आपण मुस्लिम असलो तरी दहशतवादी नाही आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ अशा अर्थाचा फ़लक घेऊन तो त्याच चौकात उभा होता आणि अनेक फ़्रेंच नागरिकांनी विश्वासाने त्याला आलिंगन दिले. तेव्हा अशी बातमी झळकली होती. तो संदर्भ घेऊन मी मुंबईतील एका दोन महिने जुन्या घटनेशी ती जोडली. मुस्लिमांनी अन्य धर्मिय वा बिगर मुस्लिमांचा विश्वास असा संपादन करण्यापेक्षा कृतीतून काही करावे, असा माझा मुद्दा होता. कारण आज जगाची स्थिती मुस्लिमांवर अविश्वास दाखवावा अशी आहे आणि त्याला मुस्लिमांविषयी इतरांचा गाफ़ील विश्वासच कारणीभूत असल्याचे मी स्पष्ट शब्दात मांडले होते. असल्या स्वरूपाचे आवाहन वा कृती विश्वास संपादनापेक्षा कांगावखोरी आहे, असाही आक्षेप मी घेतला होता. त्याला परिस्थिती कारणीभूत आहे. तो माझा पुर्वग्रह नाही किंवा अन्य कुणाचाही मुस्लिम द्वेष त्याचे कारण नाही. जगभरच्या मुस्लिमातील बहुतांश लोकांचे वर्तन त्याला कारण आहे. हा दावा इतक्या लौकर खरा ठरेल, अशी माझी अपेक्षा नव्हती. पण महेश पाटिल या जागरूक वाचकाने त्याचा पुरावाच समोर आणला.

मी लिहीतो तेव्हा मला आधी काही गोष्टी ठाऊक असतात, की बातम्या पेरण्याचे काम मी करतो, असे पाटिल यांनी आपल्या पोस्टमधून विचारले आहे. त्याचे उत्तर सोपे आहे. मला बातम्या आधी कळत नाहीत, तर प्रत्येक बातमीतून मी काही बोध घेत असतो आणि पर्यायाने तोच वाचकासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न असतो. याही बाबतीत वेगळी गोष्ट नव्हती. आजवरच्या बातम्यांच्या आधारे मी अशा आलिंगनाच्या प्रयत्नाला कांगावा ठरवले होते. आणि त्याची साक्ष लंडनच्या एका मुस्लिमाने दिली आहे. पॅरीसच्या घटनेनंतर पाश्चात्य देशात सिरीया व एकूणच जिहादविषयी कमालीची कटूता निर्माण झाली आणि आपापल्या देशावर सिरीयातील आयसिस जिहादींवर हल्ले करण्याचे दडपण यायला सुरूवात झाली. फ़्रान्सच्या अध्यक्षांनी तर विनाविलंब हल्ले सुरू केले आणि अन्य देशांनी तशी तयारी सुरू केली. ब्रिटीश सरकारने त्यासाठी संसदेची संमती मागितली, त्यावर लोकमत विभागले गेले. त्याच्या आधी महंमद मुजाहिद नावाच्या मुस्लिमाने ब्रिटनमध्ये नेमका असाच खेळ केला होता. ‘आपण मुस्लिम असून तुमच्यावर विश्वास ठेवतो मला आलिंगन द्या’ म्हणून तमाशा मांडला होता. मात्र संसदेत हा विषय आल्यावर त्याचा नूर बदलला. त्यात हल्ले करण्याच्या बाजूने मत देणार्‍या हुजूर पक्षाच्या महिला सदस्याला त्याने थेट बॉम्ब फ़ेकून मारण्याची धमकी देण्य़ापर्यंत मजल मारली. हा चेहरा खरा मानावा की त्याच्याआधी फ़लक झळकवून आलिंगन मागणारा त्याच व्यक्तीचा चेहरा खरा मानावा? मुद्दा स्पष्ट आहे. तुम्ही विश्वास ठेवाल तिथपर्यंत ठिक आहे. पण तुमचा विश्वास नसेल तर काय? सिरीयासाठी तोच मुस्लिम थेट स्वदेशी संसद सदस्याच्या घरावर बॉम्ब फ़ेकण्याची धमकी देण्यापर्यंत जातो? यातल्या कोणावर आपण विश्वास ठेवायचा, हा खरा प्रश्न आहे.

माझा दावा खरा ठरला असे मला अजिबात म्हणायचे नाही. कारण तीच वस्तुस्थिती आहे. आणि तसाही पुन्हा माझा दावा नाही. विवेकबुद्धी शाबुत असलेले अनेक मुस्लिमही त्याचीच ग्वाही देत असतात. काही दिवसांपुर्वी मी सौदी अरेबियातील खलाफ़ अल हरबी याची साक्ष काढली होती. त्याच्याही आधी म्हणजे बारा वर्षापुर्वी अब्दल रेहमान अल रशीद नावाच्या सौदी पत्रकारानेही तेच म्हटले होते. न्युयॉर्कच्या हल्ल्याला एक वर्ष पुर्ण होत असताना बिटनमधून प्रसिद्ध होणार्‍या अल शिर्क या नियतकालिकात रशीदने लेख लिहिला होता आणि तोच लेख दिर्घकाळ सौदीच्या ‘अरब न्युज’ या वेबसाईटवरही दिसत होता. त्याचे शिर्षकच थक्क करणारे होते. मुस्लिमांना आवाहन करणार्‍या त्या लेखाचे शिर्षक होते, ‘जागे व्हा! जवळजवळ सगळेच दहशतवादी मुस्लिम आहेत.’ जगातले सगळे मुस्लिम दहशतवादी नाहीत. पण जवळपास सगळे दहशतवादी तर मुस्लिम आहेतच ना? असे स्पष्ट शब्दात मांडताना रशीद यांनी रशियापासून अफ़गाण, युरोप, अमेरिका व आशियातील अनेक देशातल्या घातपाती हिंसाचाराचे दाखले दिलेले होते. त्यात कुठे बिगर मुस्लिमांचा समावेश नव्हता. जगातल्या आजच्या घडामोडी बघितल्या, तर किती टक्के हिंसाचार व दहशतवादी कृत्ये बिगरमुस्लिमांनी केलेली आपण दाखवू शकतो? भारतात तुम्ही हा विषय काढा, मग तुमच्या तोंडावर मालेगावची एक घटना मारली जाते. अधिकच झाले तर समझोता एक्सप्रेस वा कुठल्या तरी दंगलीचे दाखले दिले जातात. पण त्याचे प्रमाण कोणी सांगत नाही. त्यामुळेच सामान्य मुस्लिमाच्या नावावरही जिहादींचे कृत्य चिकटत असते. जगातल्या बहुतांश दहशतवादी घटना करणार्‍यात मुस्लिमच आपल्या धर्माचा झेंडा घेऊन पुढे येताना दिसत असतील, तर तोच निष्कर्ष काढला जाणार. तो पुसून काढायची जबाबदारी म्हणूनच सामान्य मुस्लिमांची आहे.

हा कलंक वा आरोप पुसून टाकायचा असेल, तर आलिंगनाचे नाटक पुरेसे नाही. त्यापेक्षाही पुढे जाऊन आपण जिहादी मुस्लिमांशी संबंधित नाही, याची साक्ष मुस्लिमांनी देण्याची गरज आहे. त्यासाठी धर्मामुळेच आपल्यावर अन्याय होतो असले कांगावे बंद करावे लागतील. हाच लंडनचा मुस्लिम घ्या. एका बाजूला तो विश्वासाच्या गोष्टी करतो आणि दुसर्‍या क्षणी थेट बॉम्बहल्ला करायची धमकीही देतो. ब्रिटीश नागरिक असून त्याला सिरीयातील मारल्या जाणार्‍या मुस्लिमांची चिंता आहे. पण मारला जाणारा मुस्लिम इसिसकडून मारला गेल्याची त्याला अजिबात फ़िकीर नाही. तो मुस्लिमांना मारणार्‍या व बेघर निर्वासित करणार्‍या इसिसला दोष देत नाही. पण त्याच इसिस नावाच्या जिहादी सैतानावर ब्रिटीश सेना हल्ला करणार म्हटल्यावर त्याला फ़िकीर वाटते आहे. तो लगेच बॉम्ब हातात घ्यायला निघाला आहे. कालपर्यंत त्याच्या गळ्यात गळे घालायला गेलेल्यांच्या विश्वासाचे आता काय? त्यांनी कोणाला आलिंगन दिले? मृत्यूला की विश्वासाला आलिंगन दिले? चांगुलपणा हा दुर्गुण नाही. पण गाफ़ील चांगुलपणा सर्वात जवळचा शत्रू वा शत्रूचे हत्यार असते. म्हणजेच आपल्या मारेकर्‍याला सर्वात भेदक हत्यार आपणच गाफ़िल विश्वासातून सोपवत असतो. डोळे सत्य दाखवत असतात. पण बुद्धी ठिकाणावर असली तरच त्याकडे बघता येते, विवेक शाबुत असला तरच आपला बचाव करता येतो. पण गाफ़िल चांगुलपणा यापैकी काही करू देत नाही. कुठल्याही देखाव्याला भुलून आपण आपल्याच संकटाला आमंत्रण देत असतो. ब्रिटनच्या या ‘गळेपडू’ प्रेमळ मुस्लिमाने त्याचीच साक्ष दिली आहे. म्हणून त्याला अटकही झाली आहे. त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे. अशा मुस्लिमांना रोखून व त्यांचे नाटक उघडे पाडून बाकीचे मुस्लिम इतरेजनांच्या मनात खरा विश्वास निर्माण करू शकतील. कारण अन्य कोणी मुस्लिमांवर विश्वास ठेवण्याची गरज नसून मुस्लिमांनी इतरेजनांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवण्याची गरज आहे. ते आलिंगनातून शक्य नसून आपल्याच आसपास वावरणार्‍या जिहादी व घातपाती मानसिकतेचे धर्मबंधू पकडून देण्याची कृती अधिक विश्वासार्ह ठरू शकेल.

http://www.dailymail.co.uk/news/article-3349803/Muslim-convert-faces-jail-threatening-bomb-MP-s-house.html
Link =
http://jagatapahara.blogspot.in/2015/12/blog-post_10.html

शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

कितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल?

कितीकाळ दुटप्पीपणा चालू शकेल?



"In the End, we will remember not the words of our enemies, but the silence of our friends."  - Martin Luther King Jr.

अमेरिकेतील कृष्णवर्णियांचा लढा एकहाती लढलेले व त्यासाठी आत्मबलिदान करणारे नेते म्हणून मार्टीन ल्युथर किंग ओळखले जातात. त्यांनी शांततावादी व अहिंसक संघर्ष करून अमेरिकेत समता प्रस्थापित करण्याचा पराक्रम गाजवला आहे. असा माणूस काय म्हणतो? ‘शेवटी आमच्या लक्षात शत्रूचे शब्द असणार नाहीत, तर मित्रांचे मौन लक्षात राहिल.’ वरकरणी अतिशय सौम्य वाटणारे हे शब्द आहेत. पण वास्तवात हे किती स्फ़ोटक शब्द आहेत, त्याचा अंदाज करणेही अवघड आहे. जेव्हा लढाई होते आणि कडवा संघर्ष होतो, तेव्हा शत्रू ठाऊक असतो, कारण तो समोरच असतो. त्याचे गुन्हे आपल्याला ठाऊक असतात. म्हणूनच त्याचा बंदोबस्त वा निर्दालन करायला आपण नेहमीच सज्ज असतो. पण त्याने केलेल्या इजा जखमांची वेदना जितकी भेदक व यातनामय नसते, तितके मित्रांच्या दगाबाजीचे दु:ख सतावणारे असते. शत्रूला संपवता येते, पण मित्राची दगाबाजी म्हणजे मोक्याच्या क्षणी राखलेले मौन, कधीच भरून येत नाही अशी जखम असते. मार्टीन ल्युथर यांच्यासारखा अत्यंत सौम्य व शांत प्रवृत्तीचा माणुस इतके स्फ़ोटक बोलू शकतो? तर त्यातली वेदना लक्षात घेण्य़ाची गरज आहे. ल्युथरनी कोणाही विरोधात व्यक्त केलेला तो राग व द्वेष नाही, तर वास्तविक मानवी वृत्तीचा दिलेला इशारा आहे. माणूस जखमा व वेदना विसरू शकतो. पण विश्वासघात विसरू शकत नाही, असेच त्यांना समजवायचे आहे. आणि विश्वासघात म्हणजे मोक्याच्या क्षणी दिलेला दगा असतो. मैत्रीचे व विश्वासाचे नाटक करून ऐनवेळी पाठ फ़िरवण्याला दगा म्हणतात. संकट समोरून अंगावर येत असताना ते संकटच नाही, तर आभास असल्याचे आस्थापुर्वक सांगण्याला विश्वासघात म्हणतात. असा दगा विसरता येत नाही. अगदी शांततावादी मार्टीन ल्युथरही त्याचीच ग्वाही देतात. अमेरिकेतील ताज्या हत्याकांडाचे काय?

कालपरवा लोकमतच्या एका लेखात डुकराचे चित्र प्रसिद्ध झाल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यानी त्या वर्तमानपत्राचे अंक जाळले. कचेरीवर हल्ले केले. तर तो भावनेचा तितकाच धार्मिक आस्थेचा विषय असल्याचा बचाव मांडला गेला आहे. मुस्लिमांच्या धर्मप्रेमाविषयी किंवा धर्मवेडेपणाचा दाखला वेगळा देण्याची गरज नाही. युरोपात कुठे प्रेषिताचे व्यंगचित्र काढले, म्हणून इथलेही मुस्लिम रस्त्यावर येतात आणि जाळपोळ करतात. इशान्येला म्यानमार देशात मुस्लिमांवर हल्ले झाले, म्हणून इतले मुस्लिम रस्त्यावर येऊन हिंसा करतात. इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात मुस्लिम मारले गेले, म्हणून मुस्लिमांच्या श्रद्धा दुखावल्या जातात. अशा प्रत्येक प्रसंगी आपल्या धर्माला धक्का लागला किंवा त्याची विटंबना झाली, म्हणूनच मुस्लिम रस्त्यावर आले व त्यांनी जमावाने हिंसा केली, हाच एकमेव बचाव असतो. युक्तीवाद म्हणून तो मान्य करू. कुठेही आणि केव्हाही इस्लामची विटंबना झाली, तरी मुस्लिम चवताळणार हा युक्तीवाद आहे. पण ठराविक निवडक वेळीच मुस्लिमांच्या भावना दुखावतात आणि इतर प्रसंगी इस्लामची कितीही अवहेलना झाली, तरी मुस्लिमांच्या भावना शांत रहाव्यात, अशी काही तरतुद आहे काय? कोणी इस्लामची विटंबना करावी आणि कोणी करू नये, असा काही नियम वा सुविधा आहे काय? नसेल तर कुठेही आणि केव्हाही इस्लामची अवहेलना झाली तरी तितकीच स्फ़ोटक व हिंसक प्रतिक्रीया मुस्लिमांकडून उमटली पाहिजे ना? पण तसा अनुभव येतो काय? इसिस वा अलकायदा नावाचे लोक जे काही इस्लामच्या नावाने करीत असतात, तो इस्लामचा गौरव आहे काय? तसे तर सांगायला कोणी मुस्लिम पुढे येत नाही. पण अशा घटना घडतात, तेव्हा इस्लामचा चुकीचा अर्थ लावून काही माथेफ़िरू मनमानी करतात असे सांगितले जाते.

लोकमत वा फ़्रान्सच्या कोणी चुकीचा अर्थ लावून काही केले तर तो भयंकर गुन्हा असतो आणि इसिस वा अलकायदा यांनी तसेच इस्लामचा गैर अर्थ लावून हिंसाचार केला तर तो गुन्हा नसतो काय? तेव्हाही इस्लामची विटंबनाच होत नाही काय? मग अशावेळी किती मुस्लिम वा त्यांच्या संघटना तितक्याच आवेशात रस्त्यावर येतात? म्यानमारमध्ये मुस्लिमांचे हत्याकांड झाले म्हणून रझा अकादमी मुंबईत जाळपोळ करते. पण तीच संस्था वा अन्य कुठली मुस्लिम संघटना इराक सिरीयामध्ये मुस्लिमांची कत्तल झाल्यावर किंचितही विचलीत होत नाही. कुठला मोर्चा काढत नाही, की घटनेचा निषेध करत नाही. मग त्या हिंसेचे ते मूक समर्थन नसते काय? सवाल सोपा आहे. मुस्लिमांच्या हत्याकांडाचा आवेग असतो, की त्याला मारणारा बिगर मुस्लिम असल्याचा आवेश असतो? इस्लामची विटंबना हा आस्थेचा विषय आहे की विटंबना कोणी केली यानुसार भावनांचा उद्रेक होत असतो? आपण अन्यधर्मियांशी गुण्यागोविंदाने नांदू शकतो व नांदतो, असे हवाले देणार्‍या ‘शांतताप्रिय’ मुस्लिम नागरिकांना याचे उत्तर शोधावे लागणार आहे. कारण दिवसेदिवस त्यांच्या वास्तविक भावना व त्याचे दिसणारे प्रदर्शन, यात मोठी तफ़ावत होत चालली आहे. अमेरिकेत एका शहरामध्ये पाकिस्तानी वंशाच्या एका मुस्लिम जोडप्याने अपंग सहाय्य करणार्‍या संस्थेत जावून बेछूट गोळीबार केला. त्यात पंधरा निरपराध मारले गेले. त्यानंतर प्रतिक्रीया देशाना तिथल्याच काही मुस्लिमांनी पहिली प्रतिक्रीया काय दिली? आता याचे दुष्परिणाम आम्हा स्थानिक मुस्लिमांना भोगावे लागतील. आमच्याकडे संशयाने बघितले जाईल. मुद्दा इतकाच, की पंधरा माणसे हकनाक मारली गेलीत आणि ज्यांनी मारली त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या भाऊबंदाविषयी संशय घेणेही गुन्हा ठरवला जातो आहे. ही भूमिकाच समस्या वाढवणारी आहे.

आपल्यातल्या एका मुस्लिमाने असे हिडीस हिंसक कृत्य केले, याची लाज वा खेद नाही. उलट त्यामुळे मरणार्‍यांच्या आप्तस्वकीयांना राग संताप येण्यावरच आक्षेप घेतला जात आहे. ही जगभरच्या मुस्लिमांची भूमिका व प्रवृत्ती त्यांना अधिकाधिक शंकास्पद बनवत चालली आहे. ज्यांनी कालपरवा लोकमत कार्यालयाची मोडतोड केली, त्यांनी इसिसने आपल्या कृत्यातून इस्लामची विटंबना चालविल्याच्या निषधार्थ काही केल्याचे आपल्या ऐकीवात वा़चनात आले आहे काय? नसेल तर मग अशा मुस्लिमांच्या धार्मिक आस्था शंकास्पद नाहीत काय? तस्लिमा नसरीनवर हल्ला करायला शिवशिवणारे हात, इसिसच्या बाबतीत थंड कसे पडतात? सलमान रश्दीला ठार मारायला उसळणार्‍या उर्मी, अलकायदाच्या उचापतींनंतर धर्माची प्रतिष्ठा राखायला पुढे कशाला येत नाहीत? धर्माचे पावित्र्य कोणी विटाळले, यानुसार भावना कार्यरत होतात किंवा सुप्तावस्थेत जातात, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? किंवा त्याचा दुसरा अर्थ असा असतो की इसिस वा अलकायदा यांनी जो ‘धर्मार्थ’ लावलेला आहे त्याच्याशी हे असे चवताळणारे सहमत असतात. म्हणूनच तेव्हा सुप्तावस्थेत जातात. याला बुद्धीमान पुरोगामी माना डोलवतात. पण सामान्य माणुस बुद्धीमंत वा पुरोगामी नसतो. सामान्य माणसाला तत्वज्ञान व विचारसरणीपेक्षा अनुभव शिकवत असतो. आणि जेव्हा अशा दुटप्पी अनुभवातून माणसे शिकतात, तेव्हा तारतम्याने निर्णय घेत असतात. थोडक्यात जगभरच्या मुस्लिमांसाठी आता कसोटीची वेळ जवळ येत चालली आहे. जिहादी इस्लाम की गुण्यागोविंदाने नांदवणारा इस्लाम, यातून निवड करावी लागणार आहे. नुसते प्रेमाचे, आपुलकीचे व शाब्दिक नाटक लोकांच्या अधिक काळ पचनी पडणार नाही. त्यातला मानभावीपणा जगाच्या नजरेत भरू लागला आहे. कसोटीच्या प्रसंगीचे मौन लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. म्हणूनच धर्मवेड चुचकारणारे पुरोगामी व त्यांच्या बळावर धर्मांधतेचा अतिरेक करणारे मुस्लिम नेते हेच आता जगभरच्या सामान्य मुस्लिमांचे घातक शत्रू होत चालले आहेत.

सोमवार, २३ नोव्हेंबर, २०१५

संहिष्णूता की असंहिष्णूता ?

आपण नेहमी कशाच्या तरी आधारे बोलत असतो. म्हणजे आपल्या हाती जी किंवा जेवढी माहिती आलेली असते ती सत्य आहे. अशा आधारे आपली विविध विधाने चालू असतात. म्हणून ते दावे खरे असतात असे अजिबात नाही. आपल्या हाती आलेली माहिती अपुरी वा संपुर्ण खोटी असू शकते. पण ती अपुरी वा खोटी असल्याचे कोणी सिद्ध करू शकत नसल्याने ही खरी ठरवली जाऊ शकते. उदाहरणार्थ गुजरातच्या दंगली मोदींनी मुख्यमंत्री म्हणून होऊ दिल्या वा त्यांना प्रोत्साहन दिले, असा आरोप सातत्याने होत राहिला. कारण गोध्रा येथे एका रेलडब्यातून प्रवास करणार्‍या साठ कारसेवकांना मुस्लिम जमावाने जि्वंत जाळले होते. त्यामुळे गुजरातमध्ये लोकमत प्रक्षुब्ध झाले होते. अशा वेळी दंगलीची शक्यता घेऊन सरकारने जी पावले उचलायला हवीत, ती मोदींनी उचलली नाहीत, हा त्या माहितीचा एकमेव आधार होता. त्यात पुन्हा त्या पार्श्वभूमीवर मोदींनी जी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली, त्यात उपस्थित असलेल्या संजीव भट्ट नामक अधिकार्‍याने विरोधी कॉग्रेस पक्षातल्या नेत्यांना एक खोटी माहिती पुरवली. तिथे मुख्यमंत्र्यांनीच पोलिसांना दोनतीन दिवस कारवाई करू नये असे आदेश दिल्याचे या भट्ट नामक इसमाने खोटेच सांगितले. ‘हिंदूंना आपला राग मोकळा करू द्या’ असे मोदी म्हणाल्याचे भट्टने कोणाला तरी सांगितले आणि मग ती अफ़वा वणव्यासारखी माध्यमातून फ़ैलावली गेली. उलट वास्तवात मोदींनी शेजारी राज्यांकडे अधिकचे पोलिस बळ पाठवायची विनंती केली होती. केंद्राकडे लष्कराच्या तुकड्या मागितल्या होत्या. पण हे सत्य कोण ऐकायला तयार होता? आता सुप्रिम कोर्टानेच संजीव भट्टला खोटारडा ठरवला आहे. पण त्याच्या खोटेपणाच्या आधारावर मोदींना बारा वर्षे आरोपी बनवणार्‍या कुणा शहाण्याने साधी माफ़ी तरी मागितली आहे काय? इतकी वर्षे त्यांनी छातीठोकपणे केला तो खोटेपणा व मुर्खपणा नव्हता काय?

कुठलाही पुरावा नसताना ज्याचा आवाज मोठा तो आपले असत्यही खरे म्हणून लोकांच्या गळी मारू शकतो, त्याचा हा जळजळीत पुरावाच आहे. त्यावर सुप्रिम कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले नाही, इतक्यात एक नवे धडधडीत असत्य लोकांच्या गळी उतरवण्याचा उद्योग माध्यमांनी हाती घेतला आहे. त्यातले कलावंतही नेमके तेच तसेच आहेत. गेल्या बारा वर्षात ज्यांनी मोदींवर बालंट आणायचा उद्योग करून चैन ऐषाराम केला, त्यात सर्वात पुढे होत्या तीस्ता सेटलवाड! आज त्यांच्यावर करोडो रुपयांची अफ़रातफ़र केल्याचा आरोप आहे. पण कुठलीही वाहिनी वा माध्यम त्यावर चर्चा करायला तयार नाही. कारण तसे केले तर सामान्य माणसे श्रोते वा वाचकांपुढे सत्य येऊ शकेल. मग सामान्य माणसाची निदान काही बाबतीत फ़सवणूक करणे शक्य आहे, तो मार्ग बंद होऊन जाईल. तर अशा तीस्ता सेटलवाड यांना गुजरात सरकार मुद्दाम छळते आहे, असा आक्षेप मात्र नोंदवला जातो. पण वास्तवात त्यात सरकारचा कुठलाही संबंध नाही. अहसान जाफ़री या माजी खासदाराला दंगल कालखंडात जाळुन मारले गेले, त्या जाळपोळीत एक संपुर्ण मुस्लिम वसाहत भस्मसात करण्यात आली होती. तिचे पुनर्वसन करून तिथे दंगलीचे म्युझियम उभारण्याची योजना तयार करून तीस्ता सेटलवाड यांनी करोडो रुपये जमवले आणि ते चैनीत उडवले, अशी तिथल्याच मुस्लिम रहिवाश्यांची तक्रार आहे. त्याचे पुरावेही पोलिसांना तिथल्याच रहिवाश्यांनी गोळा करून दिले आहेत. त्यात अटक होण्याच्या भयाने तीस्ता रानोमाळ भटकते आहे. पण त्यावर कुठे अवाक्षर आपल्याला ऐकू येत नाही.  मात्र तीस्ताला ज्या भयंकर दिव्यातून जावे लागते आहे, तीच आता असंहिष्णूता झालेली आहे. बहुतांश लोक सध्या असंहिष्णूतेचा आरोप करीत पुरस्कार परत देण्याचे नाटक रंगवित आहेत, त्यामागे तीस्तासारखी आपलीही अवस्था होऊ नये हीच भिती आहे.

तीस्तावर आणखी एक गंभीर आरोप आहे तो अफ़रातफ़रीचा! परदेशातून कुठल्याही प्रकारे भारतात पैसे आणले तर त्याची माहिती सरकारला जमा करावी लागते. तसा कायदा आहे. अशी रक्कम कुठल्या कारणास्तव आणली व कुठे खर्च झाली, त्याचा तपशील कायद्यानुसारच देणे भाग आहे. तीस्ताने तेच केले नाही आणि आजवरच्या सहिष्णू पुरोगामी सरकारने तिच्या त्या पापावर पांघरूण घालण्यात धन्यता मानली. ही आजच्या व आजवरच्या संहिष्णूतेची व्याख्या आहे. एकदा ही व्याख्या समजून घेतली, तर जे कोणी शहाणे पुरस्कार परतीच्या नाटकात उतरले आहेत, त्यांची झाडाझडती घेणे सोपे होऊन जाईल. यातले बहुतांश असेच आढळतील. गुणवत्तेपेक्षा त्या लोकांना परदेशी निधी व देणग्यांनीच पोसलेले आहे. रॉकफ़ेलर फ़ौडेशन, फ़ोर्ड फ़ौंडेशन वा तत्सम विविध जागतिक धर्मदाय ख्रिश्चन संस्थांनी भारतीय कायदे मोडून इथल्या राजकीय सामाजिक क्षेत्रात ढवळाढवळ करण्यासाठी ज्यांना हस्तक म्हणून पुढे केले व पोसले, अशीच ही मंडळी असल्याचे दिसून येईल. त्यांचा पोटपाण्याचा व्यवसाय कोणता म्हणून विचारले, तर समाजसेवा इतकेच उत्तर मिळू शकेल. पण विमानाने उडण्यापासून पंचतारांकित जगण्यासाठीचा पैसा त्यांनी कुठून आणला, त्याचे उत्तर सापडणार नाही. अशा हजारो संस्थांनी आजवर परदेशी पैशावर इथल्या विकास योजनांपासून विविध सरकारी धोरणांवर कुरघोडी करण्याचे काम केले आहे. एकट्या तीस्तावरच दिड कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा एका प्रकरणात आहे. अशा कमिअधिक दहा हजार संस्था आहेत, ज्यांनी आपले हिशोब ताळेबंद सादर केले नाहीत, म्हणून त्यांच्यावर नव्या मोदी सरकारने गदा आणलेली आहे. थोडक्यात हे युपीए वा नेहरूवादी व्यवस्थेने पोसलेले ‘ललित मोदीच’ आहेत. त्यांच्यावर कायद्याचा बडगा मोदी सरकारने उगारला, हा विद्यमान असंहिष्णूतेचा पुरावा आहे.

यांना एक प्रश्न सातत्याने विचारला गेला की निर्भयाकांड घडले तेव्हा तुम्ही कुठे झोपला होता? शिखांचे सामुहिक हत्याकांड झाले तेव्हा तुम्ही असंवेदनाशील कशाला होता? असे डझनावारी प्रश्न विचारले गेले, त्याचे उत्तर यातला कोणी देऊ शकला नाही. त्याचप्रमाणे आताच कशाला तुमच्या संवेदना जाग्या झाल्या, त्या मुहुर्ताचाही कुठला खुलासा हे लोक देवू शकलेले नाहीत. त्या मुहूर्ताचे पंचांग लक्षात घेतले, तर असंहिष्णूतेचे निदान सहज लक्षात येऊ शकेल. तीस्ता जाळ्यात फ़सली आहे आणि लौकरच अनेक स्वयंसेवी संस्था तशाच फ़सणार आहेत. एकदोन नव्हेतर ८९२५ स्वयंसेवी संस्थांचे परदेशी निधी मिळणारे परवाने मोदी सरकारने गेल्या जुन महिन्यात स्थगित केले आहेत. कारण त्यांनी मागल्या पाच वर्षात परदेशातून आणलेल्या निधीचे विवरण वा ताळेबंद सरकारला सादर केलेला नाही. दुसरीकडे देशाचे कायदे धाब्यावर बसवून इथे आर्थिक मनमानी करणार्‍या फ़ोर्ड फ़ौंडेशनलाही सरकारने गाशा गुंडाळायला भाग पाडले. थोडक्यात अशा परदेशी निधीवर देशात व परदेशात चैन करणार्‍या या तथाकथित साहित्यिक कलावंत विचारवंत इत्यादिकांना दणका दिलेला आहे, उजळमाथ्याने चाललेले काळे व्यवहार अफ़रातफ़रींवर मोदी सरकारने गदा आणली आहे. हा उद्योग युपीए वा कॉग्रेसच्या राज्यात राजरोस चालू होता. चोरीच्या वा बेकायदा पैशावर चैन करण्याला सहिष्णूता म्हणतात. मोदी सरकारने त्यावरच गदा आणली म्हणजे असंहिष्णूताच नाही काय? ही कारवाई सरकारने गेल्या एप्रिल महिन्यात सुरू केली आणि त्यावर शेवटचा घाव घातला गेला सप्टेंबर महिन्याच्या अखेर! जेव्हा फ़ोर्ड फ़ौंडेशनचे नाक दाबले. तिथून महिन्याभरात एकामागून एक मान्यवर प्रतिष्ठीतांना देशात अकस्मात असंहिष्णूता बोकाळू लागल्याचे भास व्हायला लागले. एकमागून एक क्षेत्रातले मान्यवर बुद्धीमंत समाजसेवी बिळातून बाहेर पडून बोंबा मारू लागले. यातल्या कुणालाही कलबुर्गी वा दादरीत कोण मारला गेला, त्याचे सोयरसुतक नाही. आपला रमणा, परदेशी दक्षिणा बंद झाल्याने त्यांना हैराण केलेले आहे. 


भाऊ तोरसेकर = http://jagatapahara.blogspot.in/